मुंबई : जगातील सर्वात मोठ्या रेस्तराँ चैन पैकी एक असलेल्या ‘मॅकडोनॉल्ड’ला अतिहुशारी नडली आहे. त्यांना ग्राहकीची फसवणूक चांगलीच महागात पडली आहे. अन्न व सुरक्षा आयुक्तांनी ‘मॅकडोनॉल्ड’ला सर्वच पदार्थांच्या नावातून ‘चीज’हा शब्द काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ‘मॅकडोनॉल्ड’ने पदार्थांतून ‘चीज’शब्द काढून टाकत पदार्थांचे नवे मेन्यू जाहीर केले आहेत. मेन्यूमधून ‘चीज’गायब झाल्याने त्याचा परिणाम आता त्यांच्या ग्राहकांच्या संख्येवर होणार हे नक्की.
नेमक प्रकरण काय?
‘चीज’च्या नावाखाली ग्राहकांची फसवणुक होत असल्याचा प्रकार अहमदनगर येथील ‘मॅकडोनॉल्ड’च्या रेस्तराँमध्ये समोर आला. येथील रेस्तराँमध्ये मिळणाऱ्या ‘मॅकडोनॉल्ड’च्या विविध पदार्थांमध्ये चीज ऐवजी चीजसदृश्य पदार्थ वापरला जात होता. याबाबत अन्न व सुरक्षा आयुक्तांनी नेमलेल्या क्वालिटी कंट्रोल ऑफिसर्सने ‘मॅकडोनॉल्ड’ला या प्रकरणामध्ये कारणेदाखवा नोटीस बजावलेली होती. मात्र, या नोटिशीनंतरही रेस्तराँकडून काहीही कार्यवाही केली जात नव्हती. त्यामुळे अहमदनगरमधील अन्न व सुरक्षा प्रशासनातील अधिकारी राजेश बढे आणि डॉ. बी. डी. मोरे यांनी ‘मॅकडोनॉल्ड’ला कारवाईचा इशारा दिला होता. अन्न व सुरक्षा आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने ‘मॅकडोनॉल्ड’मधील या पदार्थांची विक्री थांबविण्याचा इशारा देण्यात आला आहे. पदार्थांची विक्री बंद होईल या भीतीने अखेर ‘मॅकडोनॉल्ड’रेस्तराँ व्यवस्थापनाकडून अखेर पदार्थांची नावे बदलल्याचे आणि नावांमधून ‘चीज’ शब्द काढून टाकल्याचे पत्र अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांना दिले गेले आहे.
‘मॅकडोनॉल्ड’मधील पदार्थांमध्ये प्रत्यक्ष खरं ‘चीज’ न वापरता ‘चीज’सदृश्य पदार्थांचा वापर केला जात असल्याचा नुकताच खुलासा झाला. अन्न व सुरक्षा प्रशासनाच्या तपासणीदरम्यान ही बाब समोर आली. चीज न वापरता त्या नावे पदार्थ विकणे ही फसवेगिरी आहे. हे नियमांना धरुन नसल्याचा ठपका अन्न व सुरक्षा आयुक्तांनी ठेवला. ही घटना अहमदनगरमधून समोर आली असली तरी ते राज्यातील सर्वच ‘मॅकडोनॉल्ड’च्या रेस्तराँना तो लागू होणार आहे.
पदार्थांची नावे बदलली –
बदलेलं नाव ( जुनी नावे)
वेज नगेटस (चीझी नगेटस)
चेड्डार डिलाईट वेज – नॉनवेज बर्गर (मॅक चीज वेज – नॉनवेज बर्गर)
अमेरिकन वेज बर्गर (कॉर्न अॅण्ड चीज बर्गर)
अमेरिकन नॉन-वेज बर्गर (ग्रील्ड चिकन अॅण्ड चीज बर्गर)
ब्ल्यु बेरी केक (ब्ल्यु बेरी चीज केक)
इटालियन वेज- नॉन वेज बर्गर (चीजी इटालियन वेज- नॉन वेज बर्गर)