MVA Protest News : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद बघायला मिळाले. नागरिकांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केला. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. आता छत्रपती शिवाजी महाराजांचाच्या पुतळ्याच्या विटंबनाप्रकरणी आज महाविकास आघाडीकडून राज्य सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नाना पटोले, शाहू महाराज छत्रपती यांच्यासह मविआचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी हुतात्मा चौकात दाखल झाले असून इथून महाविकास आघाडीचा मोर्चा गेटवे ऑफ इंडिया येथे धडकणार आहे. तसेच राज्यातही विविध ठिकाणी मविआने आंदोलन सुरु केले आहे.
मविआचे जोडे मारो आंदोलन!
मालवणमधील घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोडे मारो आंदोलन सुरू केले आहे. मुंबईमधील गेट वे ऑफ इंडिया परिसरात हे आंदोलन सुरु असून उद्धव ठाकरे, शरद पवार, शाहू महाराज छत्रपती, संजय राऊत खासदार सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह मविआचे सर्व नेते आणि पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी शिवाजी महाराज यांची मूर्ती हातात घेऊन मविआच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
घोषणांनी परिसर दणाणला..
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी १० पासून गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी जय शिवाजी जय भवानी, महाराज आम्हाला माफ करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेल्याचे पाहायला मिळाले. हुतात्मा चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मविआने आंदोलनाला सुरूवात केली आहे.
नांदेडमध्येही मविआचे जोरदार आंदोलन!
राज्य सरकारच्या विरोधात राज्यभरात महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन सुरू असून आज नांदेडमध्ये देखील महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत भर पावसात हे आंदोलन करण्यात आले आहे. नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गोंधळ!
छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकातही महाविकास आघाडीने जोडो मारो आंदोलन सुरु आहे. तर त्याचठिकाणी भाजपकडूनही आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सर्व केंद्र, प्रदेश, शहर, मंडळ, वॉर्ड, मोर्चा, आघाडी, प्रकोष्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेले पोस्टर झळकावल्याने वाद झाल्याचे बघायला मिळाले. पोलिसांनी हे पोस्टर तात्काळ ताब्यात घेतले असता यावेळी पोलीस आणि मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचेही बघायला मिळाले.