मुंबई : मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षण सर्वेक्षणाला सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या आंदोलकांनी मुंबईकडे कूच केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी वेग आला आहे. या सर्वेक्षणासाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे.
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे कामकाज मंगळवार 23 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. हे सर्वेक्षण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील करण्यात येणार असून यासाठी महापालिकेचेदेखील सहकार्य असणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यात सर्वेक्षण करणार आहेत. त्यामुळे या प्रशासकीय कामासाठी आपल्या घरी, अपार्टमेंट मध्ये, सोसायटीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित कर्मचारी मंगळवारपासून आपल्या घरी, सोसायटी आणि अपार्टमेंटमध्ये येतील. संबंधित कर्मचाऱ्यांकडे स्वत:चे ओळखपत्र असणार आहे. त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मुंबईकरांनी सहकार्य करावे आणि त्यांना अपेक्षित असलेली माहिती भरून दयावी. ही माहिती मोबाईलफोनवर आधारित एका ॲपमध्ये नोंदविण्यात येणार असून माहिती नोंदविल्यानंतर माहिती देणाऱ्याची स्वाक्षरी देखील ॲप मध्ये जतन केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.