मुंबई : राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा काही प्रमाणात सोडवण्यात यश मिळवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक सादर केलं असून हे विधेयक एकमताने मंजूर देखील झालं आहे. आता मुख्यमंत्री हे विधेयक विधान परिषदेत मांडणार आहेत.
अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक एक – महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांकरिता मांडत असलेलं आरक्षण विधेयक संमत करावे, असा प्रस्ताव मी सर्वांच्या अनुमतीने मांडतो. यासह त्यांनी आरक्षण विधेयक विधानसभेच्या पटलावर ठेवलं. याबाबत विधानसभेतील सर्व सदस्यांनी ‘होय’ म्हणून अनुमोदन दिलं आहे. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घोषणा केली आहे की, हे विधेयक बहुमतासह संमत करत आहोत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी सभागृहाला विनंती आहे की आपण बहुमत म्हटलं आहे, त्याऐवजी एकमत म्हणायला हवं. कारण विरोधी पक्षांनीही त्याला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांची भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमचीदेखील मागणी होती आणि आहे. असं वडेट्टीवार म्हणाले.
या विधेयकाला कोणाचाही विरोध नव्हता आणि नाही किंवा विरोध असण्याला काही कारणही नाही. त्यामुळे मी विधानसभा अध्यक्षांना विनंती करतो की, तुम्ही हे विधेयक बहुमताने मंजूर झालं असं म्हणू नका. त्याऐवजी एकमताने मंजूर झालं असं म्हणा, आमच्या त्यास पूर्ण पाठिंबा आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व विधानसभा सदस्यांच्या अनुमोदनानंतर घोषणा केली की, मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करत आहोत.