मुंबई: मॉरीसभाई नावाच्या गुंडाने गुरुवारी उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. फेसबुक लाइव्ह करत मॉरीस याने थेट अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर अभिषेक घोसाळकर हे जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून आणि पैशाच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मॉरीस याच्या बायकोची चौकशी केली. तिच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मॉरिसच्या पत्नीच्या जबाबावरुन त्याने अभिषेक घोसाळकर यांना संपविण्याचा कट आधीपासूनच आखल्याचे निष्पन्न होत आहे.
मॉरिस नोरोन्हा याच्या पत्नीने गुन्हे शाखेच्या युनिट 11 च्या अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला. यावेळी तिने सांगितले की, मॉरिस हा एका बलात्काराच्या प्रकरणात पाच महिने तुरुंगात होता. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनीच आपल्याला या बलात्कार प्रकरणात अडकवल्याची मॉरिसची समजूत होती. त्याला काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. मात्र, सतत त्याच्या मनात अभिषेक घोसाळकर यांच्याविषयीचा राग होता. घरात वावरत असताना मॉरिस अनेकदा म्हणायचा की, ‘मी अभिषेकला सोडणार नाही, त्याला संपवणारच’, असे मॉरिसच्या पत्नीने जबाबात सांगितले. मॉरिसच्या पत्नीने दिलेली ही माहिती तपासात महत्वाची ठरणार आहे. पोलिसांकडून मॉरिसच्या पत्नीला पुन्हा जबाब नोंदवण्यसााठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. आता पुढे येणाऱ्या काळात ती पोलिसांनी आणखी कोणती माहिती देणार, हे पाहावे लागेल.
पोलिसांच्या तपासादरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलाविषयी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मॉरिस नोरोन्हाचा बॉडीगार्ड मिश्रा याला ताब्यात घेतले आहे. मॉरिसने ज्या बंदुकीने घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या ती बंदूक मिश्रा याची होती. ही बंदूक परवानाधारक होती. तसेच पोलीस सध्या या अंगरक्षक मिश्राकडून माहिती घेत आहेत.