मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक यांनी महारेराचे अध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज मंत्रालयात सौनिक यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, महारेराचे सदस्य महेश पाठक, माजी सदस्य एस. एस. संधू, महारेराचे मावळते अध्यक्ष अजोय मेहता तसेच गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महारेराचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ आज २० सप्टेंबर २०२४ रोजी संपत आहे. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सल्लागार तसेच राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी महारेराच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणजे फेब्रुवारी २०२१ मध्ये महरेराच्या अध्यक्षपदी अजोय मेहता यांची नेमणूक करण्यात आली होती. जुलै महिन्यातच राज्याच्या गृहनिर्माण विभागाने मनोज सैनिक यांच्या महारेरा अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे आदेश जारी केले होते.
महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले मनोज सौनिक हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९८७ च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. ३० एप्रिल २०२३ रोजी त्यांनी राज्याचे मुख्य सचिव म्हणून सूत्रे स्वीकारली होती. आठ महिन्यानंतर सौनिक हे ३१ मे २०२३ रोजी मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सौनिक यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सल्लागार म्हणून केली होती. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज सौनिक यांना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महारेराच्या प्राधिकरणावर नियुक्ती करण्यात आली आहे.