मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली होती. मात्र, सरकारने अद्यापही या प्रश्नावर तोडगा काढलेला नाही. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी २३ डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभा घेऊन मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, २० जानेवारीला मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना होणार आहेत. अंतरवाली सराटीतून मोर्चाला सुरुवात होणार असून, आंदोलक अंतरवाली ते मुंबई असा पायी प्रवास करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज जरांगेंचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले असून, हालचालींना वेग आला आहे.
जालना, शहागड, गेवराई (बीड), अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खराडी, शिवाजीनगर, पुणे त्यानंतर पुढे पुणे, मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे आझाद मैदानावर ही पायी दिंडी पोहचणार आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगेंचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले आहे. हे शिष्टमंडळ आंदोलनासाठी मुंबईतील मैदानाची पाहणी करणार आहेत. शिवाजी पार्क, बीकेसी, आझाद मैदानाची पाहणी करणार आहेत. दादरमध्ये सकाळी ११ वाजता व्यापक बैठक होणार आहे.
जालना जिल्ह्यातील अनेक गावांतील मराठा सेवकांचा या टीममध्ये समावेश आहे. हे शिष्टमंडळ मैदानाची पाहणी करून त्याच ठिकाणी बैठक घेऊन आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, २० जानेवारीला आम्ही मुंबईकडे प्रस्थान करणार आहोत. या आंदोलनात कोट्यवधी मराठा बांधव सहभागी होतील. दहा लाखांहून अधिक वाहनांचा यामध्ये समावेश असेल, अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली. या आंदोलनाचे नियोजन आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी हे शिष्टमंडळ आता मुंबईत दाखल झाले आहे.
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. जागावाटप आणि मोर्चेबांधणी सुरु आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ येत आहे. त्यावरुनही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तर दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मुंबईत जाण्याचा मार्ग काय असेल? काय वस्तू सोबत घ्याव्यात? याविषयी माहिती दिली आहे. जरांगे पाटील मराठा आंदोलनासाठी मोठा लढा उभारण्याच्या तयारीत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र ही जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, दुसरीकडे ओबीसी समाजाचा या मागणीला विरोध आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकार नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.