मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अनेक दिवसापासून आंदोलन सुरु आहे. आंतरवाली सराटी येथून काढलेली पदयात्रा आता नवी मुंबईच्या दिशेने येत आहे. प्रजासत्ताक दिनी ही पदयात्रा मुंबईत धडकणार असं चित्र स्पष्ट झालं आहे. दरम्यान, जरांगे पाटील मुंबईत येऊ नये, यासाठी सराकारकडून चर्चा सुरु आहे.
अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र एक वेगळीच भीती व्यक्त केली आहे. प्रकाश आंबडेकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दडपण्यासाठी राजकीय प्रयत्न होण्याची शक्यता आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. यासाठी माझा सल्ला असेल की त्यांनी लोकांच्या पंगतीतच जेवण करावे.
त्यांनी वेगळे जेवण केल्यास त्यांच्या जेवणात जुलाबाचे औषध टाकले जाऊ शकते. पण पंगतीच्या जेवणात मोठ्या प्रमाणात औषध टाकले जाऊ शकत नाही. जर आंदोलनाचे नेतृत्व करणारा व्यक्ती आजारी पडून रुग्णालयात दाखल झाल्यास आंदोलन भरकटते. त्यामुळे जरांगे पाटील यांनी काळजी घेण्याचा सल्ला प्रकास आंबडेकर यांनी दिला आहे.
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याशी प्रामाणिकपणे चर्चा करावी. आठवड्याभरात देऊ, महिन्याभरात देऊ, विशेष अधिवेशन घेऊ, असं पोकळ आश्वासन देऊ नयेत. ही आश्वासने म्हणजे चॉकलेट दाखविण्याचा प्रकार आहे. जरांगे पाटील यांनाही याची कल्पना आहे. त्यामुळे राज्य सरकारने आरक्षण देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावेत आणि तसा शब्द द्यावा, असेही प्रकाश आंबडेकर म्हणाले.
माझी भूमिका अशी आहे, ओबीसींचे वेगळं आणि गरीब मराठ्यांचं वेगळं आहे. त्या पद्धतीने त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे. जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी एक राजकीय भूमिका घ्यावी लागणार आहे. ओबीसीने भाजप आपला तारणकर्ता नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे. तसेच राज्य सरकारची प्रामाणिकता दिसली तर लोकही त्यांचे नक्कीच ऐकतील. मात्र सरकारने फसवाफसवी करण्याचा प्रयत्न केल्यास, आंदोलन आणखी तीव्र होईल, असही प्रकाश आंबेडकर आंबेडकर म्हणाले.