मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच आज आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला एक प्रस्ताव दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावाद्वारे केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या बैठकीत ज्या दिवशी शरद पवार, उद्धव ठाकरे असतील, तेव्हा प्रकाश आंबेडकर असतील. आज आम्ही बैठकीत प्रस्ताव दिला आहे. आम्ही चार मागण्या मांडल्या आहेत. जालन्यातून मनोज जरांगे पाटील यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी. तर पुण्यातून अभिजीत वैद्य यांना अधिकृत उमेदवार घोषित करावे.
तसेच पंधरा ओबीसींच्या, तर तीन अल्पसंख्याक यांना उमेदवारी द्याव्यात. एकूण २७ जागांचा प्रस्ताव सादर केला आहे. आम्ही २७ जागांसाठी यादी दिली, काही अपवाद वगळता चर्चा करू. आम्हाला महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पत्र लिहून अनेकदा मागणी केली. घटक पक्षांनी चर्चा करून निर्णय घ्यावा. जागावाटपाबाबत तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत चर्चा करण्यासाठी तयार आहे. जालन्यामधून मनोज जरांगे यांना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून पाठिंबा द्यावा, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीच्या काय आहेत मागण्या?
- महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य यांना उमेदवार म्हणून जाहीर करावे.
- महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार असावेत.
- महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने असे लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपामध्ये सामील होणार नाही.
- लोकसभेच्या निवडणुकीत किमान ०३ अल्पसंख्यांक उमेदवार असावेत.