मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारमधील संघर्ष आता अधिक पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेले आहेत. अशातच आता सरकारने अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळाचा मंडप पोलिसांच्या माध्यमातून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा हल्लबोल केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. गॅझेट सुद्धा घ्या. ते लोक तुम्हाला अंगावर घेऊन नाचतील. त्यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न करु नका. मी समाजाला किती जीव लावतो हे सर्वांनी पाहिले आहे. मी आरामात जगू शकत नाही. मी अंतरवालीला निघालो होतो, पोलिसांच्या शब्दावर मी इथे थांबलो आहे.
पोलिसांनी मंडपाला आणि व्यासपीठाला हात लावणार नाही असा शब्द दिला आहे. अंतरवालीतील मंडपाला किंवा छत्रपतींच्या मूर्तीला हात लावला तर गृहमंत्र्याला सुट्टी नाही, अशा शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्र्यांना इशारा दिला आहे.
तसेच पुढे बोलताना म्हणाले, मी जेलमध्ये सडायला तयार आहे. पण अंतरवालीतील मंडपातील एक कापडही काढू देणार नाही. असं आव्हान मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे. त्यामुळे येत्या काळात मनोज जरांगे आणि राज्य सरकारमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
शिवरायांच्या मूर्तीला हात लावाल तर महागात पडेल
अंतरवालीकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांची पोलीस अधिकाऱ्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे. यावेळी बोलताना त्यांनी मंडप सध्या तरी हटवण्यात येणार नाही असं आश्वासन पोलिसांनी जरांगे यांना दिल्याची माहिती आहे. मंडपाच्या एकाही कापडाला हात लावला, त्यावरील शिवरायांच्या मूर्तीला हात लावाल तर महागात पडेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.