मुंबई : मित्राचा मृतदेह सुटकेस मधून तुतारी एक्सप्रेसने निघालेल्या एकाला दादर रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन पायधुनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दादर स्थानकातून कोकणात जाणाऱ्या तुतारी एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न दोन तरुणांकडून होत होता. मात्र त्यांच्याकडे असलेली मोठी सुटकेस त्यांना काही केल्या उचलता येत नव्हती. सुटकेस उचलता उचलता दोघांनाही घाम फुटला होता. तसंच, सुटकेसच्या चाकावर रक्ताचे थेंबही दिसून आले. दोन्ही तरुणांचे संशयास्पद वागणं पाहून आरपीएफ जवानाला संशय आला. त्यानंतर त्याने बॅग उघडून बघितली आणि धक्काच बसला. बॅगमध्ये एका तरुणाचा मृतदेह होता.
या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी हत्याचा गुन्हा दाखल करून या हत्येप्रकरणी दोन मूकबधिर तरुणांना अटक केली.
जय प्रवीण चावडा आणि शिवजीत सुरेंद्र सिंग असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. अर्षद अली सादिक अली असे मृत तरुणाचे नाव आहे. हे तिघे ही मूकबधिर आहेत आणि ते सांकेतिक भाषेचा वापर करून संवाद साधतात. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी सांकेतिक भाषा तज्ज्ञाला बोलावले, त्यानंतरच हत्येचे कारण स्पष्ट झाले.
दादर रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याप्रकरणी मृतदेह घेऊन जाणारा जय प्रवीण चावडा याला ताब्यात घेण्यात आले. तपासात शिवजीत कुमार सिंह याने त्याचा मित्र जय प्रवीण चावडा याच्या मदतीने केल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सिंह याची माहिती घेऊन त्याला उल्हासनगर येथून अटक केली. गुन्ह्यांत वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे.
पायधुनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, या प्रकरणात कुर्ला येथे राहणाऱ्या अर्शद शेखच्या हत्येत या दोघांचा सहभाग होता. हत्येनंतर संशयित मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुतारी एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करत होते. पोलिस पथकाने संशयास्पद बॅगची तपासणी सुरू केली, जिथे त्यांना मृतदेह सापडला. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.