उल्हासनगर : पहिल्याच पावसात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळण्याची घटना घडली. अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग गडावर सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन जखमींवर उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. गुलाम सय्यद (३५) असे मृताचे नाव आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलीस घटनास्थळी पोहोचले.
श्रीमलंग गडावर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. मात्र डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या या कुटुंबांना पावसाळ्यात धोका निर्माण होतो. धोका असूनही येथे वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. सोमवारी सकाळी एका घरावर दरड कोसळली. दरड कोसळताना मुलाचा जीव वाचवायला गेलेल्या वडिलांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
लोकसभा निवडणुकीच्या आधी वनविभागाने येथील बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली होती. मात्र सुरू झालेली कारवाई लवकरच आटोपती घेतल्याने दरड कोसळल्याची घटना घडली. गुलाम सय्यद असे मृताचे नाव आहे. तर त्यांचा दीड वर्षाचा मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. मुलाचा जीव वाचवायला गेले असताना मुलाचा जीव वाचला, मात्र वडील गुलाम सय्यद यांना जीव गमवावा लागला. तर तात्यांची पत्नी नाभिया आणि मुलगा गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.