कल्याण : फेसबुकवर झालेल्या ओळखीतून एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्याचा साथीदार असलेला दुसरा आरोपी मात्र अद्यापही फरार आहे.उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेची गुजरातच्या जामनगरचा रहिवासी असलेल्या हिरेन बाबू नडियापरा याच्याशी फेसबुकवर ओळख झाली.
या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाल्यानंतर त्याने अरविंद म्हात्रे या साथीदाराला घेऊन ऑक्टोबर २०२३ मध्ये लोणावळा येथील एका हॉटेलमध्ये पीडित महिलेवर अत्याचार केले. त्यानंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मार्च २०२४ मध्ये कल्याणमधील एका हॉटेलमध्ये पुन्हा अत्याचार करण्यात आले. अखेर पीडित महिलेने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनीही दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत हिरेन नडियापरा याला जामनगर येथून अटक केली. मात्र, त्याचा साथीदार अरविंद म्हात्रे हा अद्याप फरार आहे. विशेष म्हणजे तो निवडणुकीत खुलेआम प्रचार करतांना दिसत असूनही त्याला पोलीस का अटक करत नाहीत, असा संतप्त सवाल पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.