मुंबई : राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसामुळं शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. तसेच नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा आदी विविध भागातील विविध जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
शेतात काढून ठेवलेल्या पिकांचे नुकसान
राज्यातील विविध भागातील शेती पिकांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान झाले आहे. बहुतांश ठिकाणी शेतात काढून ठेवलेली पिके भिजली आहेत. विशेषतः भात, सोयाबीन, तूर, कपाशी, ऊस आदी विविध प्रकारच्या पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. तसेच नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
पंचनामे आणि नुकसान भरपाईसाठी नुकसानग्रस्त गावांमध्ये त्वरित यंत्रणा कार्यरत करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. जिल्हास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तालुकास्तरीय यंत्रणा, इतर सर्व संबंधित विभाग यांनी यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना देखील एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.