कल्याण : कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. उल्हासनगर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्यामुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान महेश गायकवाड यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कल्याण पोलीस अलर्ट मोडवर असून महेश गायकवाड यांचे घर आणि ऑफिस बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती कोळसेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली आहे.
कल्याण पूर्वेला महेश गायकवाड यांचे जंगी स्वागताची तयारी
महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्याता आहे. यामुळे कल्याण पूर्वेला महेश गायकवाड यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी सुरु आहे. त्यांच्या स्वागतासाठी कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावण्यात आले आहेत. ‘ गोर गरीबाचा कैवारी’… ‘टायगर इज बॅक’, हेच प्रेम हेच आशीर्वाद, जनतेचा रथ पुन्हा लवकरच मैदानात येणार, महेश गायकवाड कल्याणकर तुमचे स्वागत करीत आहेत अशा आशयाचे बॅनर सगळीकडे झळकत आहेत. तर दुसरीकडे महेश गायकवाड शहर प्रमुख, माजी नगरसेवक, भावी आमदार अशा आशयाचे बॅनरही काही ठिकाणी झळकत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.