मुंबई: महायुतीच्या नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी तीनही पक्षीतील ज्येष्ठ नेत्यांसह आमदारांनी आपापल्या नेत्यांकडे लॉबिंग सुरू केले आहे. तसेच गुरुवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यातच आपल्याला मंत्रीपदाची शपथ द्यावी, अशी मागणी अनेक नेत्यांनी केल्याची माहिती आहे. नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. २०१९ मधील महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार, महायुतीतील ४३ पैकी ३९ ते ४० मंत्र्यांना शपथ देण्याचा विचार महायुतीच्या नेत्यांचा आहे. जनतेने मोठे बहुमत दिले आहे. त्यामुळे सर्व मंत्र्यांनी ताकदीने काम करण्याचा विचार भाजपमधून मांडला जात आहे.
त्यामुळे आता गुरुवारी किती मंत्री शपथ घेणार याची उत्सुकता आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्रिकूट कायम राहणार आहे. याशिवाय भाजपमधून कोण कोण मंत्री असतील, यावर भाजपने विचार करून ठेवला आहे. शिवसेना-राष्ट्रवादीकडूनही आपल्या नेत्यांची यादी तयार आहे. भाजपकडे गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची खाती असतील. भाजप विधानसभा अध्यक्षपदही आपल्याकडे कायम ठेवणार आहे.
भाजपमधून काही ज्येष्ठ नेत्यांना वगळण्याचा विचार होता, पण आता सर्वांनाच संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र खराब कामगिरी केलेल्या नेत्यांना संधी मिळणार नसल्याची माहिती आहे. नव्या सरकारमध्ये भाजपला २० ते २२ मंत्रीपदे मिळणार आहेत. त्यातील दोन मंत्रीपदे मित्रपक्षांना दिली जातील. विनय कोरे आणि आठवले यांच्या पक्षाला प्रत्येकी एक-एक मंत्रीपद मिळेल, शिवसेना (शिंदे) पक्षाला १० ते ११ मंत्रीपदे, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ८ ते ९ मंत्रीपदे मिळतील, अशी माहिती आहे.
भाजपमधील संभाव्य चेहरे
सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रकात पाटील, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, आशिष शेलार, संजय कुटे, माधुरी मिसाळ, मोनिका राजळे, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले, विजयकुमार देशमुख, योगेश सागर, गोपीचंद पडळकर, संतोष दानवे, नितेश राणे, राजहंस सिंह यांची नावे चर्चत आहेत. मित्रपक्षातून विनय कोरे आणि आठवले यांच्या पक्षातून एका नेत्याची वर्णी लागेल.
राष्ट्रवादीचे संभाव्य चेहरे
अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, नरहरी झिरवळ, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, अनिल पाटील, संजय बनसोडे, इंद्रनिल नाईक
शिवसेनेचे संभाव्य चेहरे
एकनाथ शिंदे, दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रकाश आबिटकर यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून भावना गवळी, मनीषा कायंदे आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यापैकी एका महिलेला मंत्रीपदाची संधी मिळेल, असे सांगण्यात आले.