पुणे : महावितरणसह महापारेषण, महानिर्मिती कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. समान काम, समान वेतन लागू करावे, वीज विद्युतच्या तिन्ही कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या एनएमआरप्रमाणे सामावून घेण्यात यावे, यांसह इतर अनेक मागण्यांसाठी हे कामगार संपावर जाणार आहेत.
महाराष्ट्रातील 42 हजार कंत्राटी कामगारांनी हा संप पुकारला असून, या संपात इंदापूर उपविभागाअंतर्गत एकूण 74 कर्मचारी सहभागी होणार आहेत. कंत्राटी कामगारांचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत सध्याच्या पारेषण व वितरण भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी. अशा विविध मागण्यांचा सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वीज कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी दिला.
तसेच जे कंत्राटी कामगार गेली 10 ते 15 वर्षे विद्युत महामंडळात सेवा बजावत आहेत, अशा कामगारांना वयोमर्यादेची अट शिथिल करून निघालेल्या भरतीमध्ये सामावून घेण्यात यावे. वयाच्या 60 व्या वर्षांपर्यंत रोजगाराची शाश्वत हमी द्यावी या प्रमुख मागण्यांसह एकूण 17 मागण्यांसाठी महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीचे कंत्राटी कामगार मंगळवारी (दि.5) रात्री बारापासून बेमुदत संपावर जाणार आहेत.