मुंबई : महाविकास आघाडीचा मोठ्या संघर्षानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. बैठकीच्या अनेक फेऱ्या उलटल्यानंतर महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा सुटला असून आज तिन्ही पक्षांची एकत्र पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये जागा वाटप जाहीर केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला 105 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला 95 जागा मिळणार आहेत. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 80 ते 85 जागा मिळणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये विदर्भातल्या जागांवरून वाद पेटला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातला वाद टोकाला गेला होता. तेव्हा वाटत होतं की आता महाविकास आघाडीमध्ये फूट पडते की काय?, परंतु आता महाविकास आघाडीमध्ये सर्व आलबेल असल्याचे चित्र असल्याचे दिसत आहे.
काँग्रेस हायकमांडने बाळासाहेब थोरात यांच्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत बोलण्याची जबाबदारी सोपविली होती. यानंतर आज बाळासाहेब थोरात आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा एकदा बैठक झाली. या बैठकीमध्ये जागा वाटपाचा अंतिम तोडगा निघाला आहे.