मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेची महाविकास आघाडीकडून प्रतीक्षा केली जात आहे. वंचितला महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे, जो त्यांना अमान्य आहे. आता वंचित बहुजन आघाडीला आता चार ऐवजी पाच जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान महाविकास आघाडीचे जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 22, काँग्रेस 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. जर वंचित बहुजन आघाडी सोबत आली तर शिवसेनेच्या कोट्यातून दोन, काँग्रेसच्या कोट्यातून दोन आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आज पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर आपली भूमिका बुधवारी जाहीर करतील, अशी चर्चा आहे. आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे पूर्वीच सांगितले आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आता महाविकास आघाडीसोबत लढणार की तिसऱ्या आघाडीचा पर्याय स्वीकारणार हे बुधवारी स्पष्ट होणार आहे.