मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देताना महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज (दि. १५) महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषद बोलताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूकही पूर्ण ताकदीने लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून स्वबळाचा लढण्याचा जो नारा देण्यात येत होता, त्याला त्यालाही पूर्णविराम मिळाला. चव्हाण यांनी सांगितले की, आज महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांची प्राथमिक बैठक झाली. ही बैठक विधानसभेची पूर्वतयारीसाठी होती. आम्ही ज्या पद्धतीने लोकसभेसाठी लढलो, त्यापेक्षा दुप्पट ताकदीने लोकांचे प्रश्न मांडून राज्यामध्ये देखील सत्ता बदल करू, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, संजय राऊत, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, वंदना चव्हाण उपस्थित होत्या. यावेळी बोलतानाु उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी भाजपसह मोदींचा चांगलाच समाचार घेतला. महाविकास आघाडीकडून निवडणुकीत मदत करणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटकांचे आभार मानण्यात आले.
यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणालेकी, महाविकास आघाडीची ही पत्रकार परिषद महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्रात जनतेने घवघवीत यश महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकले आहे. अनेक संघटनांनी आणि छोट्या पक्षांनी वातावरण निर्मितीसाठी मदत केल्याचा विशेष उल्लेख पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही सरकारला शेतकरी बांधवांनी सुद्धा थेट संदेश दिला आहे. लोकसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुद्धा झाला. मात्र, तो अपयशी ठरल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
विधानसभासुद्धा एकत्रित लढणार : उद्धव ठाकरे
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, आज आमची प्राथमिक एक बैठक पार पडली आहे. आगामी काळात होणारी विधानसभा निवडणूक सुद्धा एकत्रित लढणार आहोत. त्यांनी सांगितले की, आम्ही महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. ही लढाई संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी होती.
तेवढा जास्त फायदा आम्हाला होईल, शरद पवारांचा मोदींना टोला
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात 18 सभा घेतल्या. त्यांचा एक रोड शो सुद्धा झाला. विधानसभेला सुद्धा जेवढ्या त्यांच्या सभा होतील, तेवढा जास्त फायदा आम्हाला होईल, अशा शब्दांत शरद पवार यांनी मोदी यांच्या प्रचारसभांवरून टोला लगावला.