मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक बुधवारी वरळीच्या फोर सिझन हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीला उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचीही या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपाच्या फॉर्म्युलावर प्रतिक्रिया दिली. पुढच्या बैठकीत सर्व गोष्टी ठरतील, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.आजची बैठक सकारात्मक झाली का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला काय दिसतंय? असा उलट प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.
9 तारखेला पुन्हा एकदा वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रकाश आंबेडकरांना नेमक्या किती आणि कोणत्या जागा द्यायच्या याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. बुधवारी प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास 17 जागांवरील लोकसभा मतदारसंघावर चर्चा केली. यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांकडे काही जागांची अदलाबदली करावी, अशी भूमिका मांडल्याची माहिती मिळाली आहे.