मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे २८८ मतदारसंघांतील उमेदवार ठरविण्यासाठी प्रमुख तीन पक्षांच्या नेत्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत या तीन नेत्यांची समिती महाविकास आघाडीचे २८८ जागांवरील उमेदवार निश्चित करेल.
विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी १२ ऑक्टोबरच्या आसपास निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागेल. येत्या बुधवारी पितृपक्ष पंधरवडा संपत आहे. त्यानंतर नवरात्र सुरू होत आहे. या दरम्यान, महायुतीसह महाविकास आघाडीचे जवळपास ९० टक्के जागावाटप तसेच उमेदवार निश्चित झालेले असतील. महायुती व आघाडीत ज्या पक्षाचा सध्या आमदार त्या पक्षाला उमेदवारी हे सूत्र निश्चित झालेले आहे.