मुंबई: महाराष्ट्राच्या विधीमंडळाची भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडली जाईल, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, सतत आरोप करणारे खासदार संजय राऊत यांच्यावरही राहुल नार्वेकरांनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे. विधानसभा अध्यक्षांना राजकीय फासावर लटकवा, असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं होतं. यावर बोलताना अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी संजय राऊत म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट आहे का? असं म्हणत त्यांच्या वक्तव्याकडे मी लक्ष का द्यावं, असं म्हटलं आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष आणि आमदार अपात्रता प्रकरणी दिरंगाई यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, “आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. आता हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. काही वेळातच या संदर्भात सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की, नेमकं नियमबाह्य अथवा घटनाबाह्य कृत्य झालं आहे का?, ते जर समजलं नाही, तर पुढची कारवाई कशी काय होऊ शकेल? त्यामुळे मला वाटतं सुनावणी झाल्यानंतर याबद्दल जास्त स्पष्टता प्राप्त होईल.” असंही नार्वेकर म्हणाले.