Maharashtra Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोग सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. या आढाव्यासाठी आयुक्तांनी सर्व सरकारी संस्था आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. आयुक्त राजीव कुमार यांनी अकरा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर आज शनिवारी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. तसेच राज्य निवडणूक आयोगाला महत्वाच्या सूचना देखील केल्या आहेत.
निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार म्हणाले कि, आगामी निवडणुकाबाबत काय तयारी असणार? हे तुम्हाला सांगतो आहे. आमचा महाराष्ट्र आमचं मतदान हा आमचा नारा आहे. लोकशाहीच्या उत्सवात लोक आपलं योगदान देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपले मत, आपला हक्क ही आपली जबाबदारी आहे. असं निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले आहेत.
पुढे बोलताना म्हणाले कि, आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या. स्थानिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष यांच्याशी भेटीगाठी घेतल्या. पोलीस महासंचालक, आयुक्त तसंच इतरांचीही भेट घेतली. आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते निर्देश दिले. आम्ही बसपा, आप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी, शिवसेना उबाठा, भाजपा अशा सगळ्या पक्षांची भेट घेतली आहे. या पक्षांनी आम्हाला दिवाळीचा मुद्दा सांगितला. तो महोत्सव लक्षात घेऊन निवडणूक तारीख जाहीर करा अशी विनंती त्यांनी आम्हाला केली आहे. निवडणुकीची तारीख ही सुट्ट्या लक्षात घेऊन ठरवा अशीही विनंती आम्हाला कऱण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ मतदारसंघ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याआधीच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात ९.५९ कोटी मतदार आहेत. यामध्ये पुरुष ४.५९ कोटी मतदार आहेत. तर महिला ४.६४ कोटी आहेत.
आम्ही तृतीय पंथीय, वृद्ध मतदार, दिव्यांग यांची विशेष व्यवस्था करणार आहोत. वृद्ध मतदारांना मतदान करण्यासाठी आम्ही मत देण्याची विनंती करतो. त्यांना केंद्रात जाणं शक्य नसेल तर घरुन मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्याही महाराष्ट्रात चांगली आहे. १९.४८ लाख मतदार हे नवमतदार आहेत. हे तेच मतदार आहेत जे लोकशाहीला पुढे घेऊन जातील असंही राजीव कुमार यावेळी म्हणाले.