मुंबई : मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा सहयोगी प्राध्यापकाकडून झालेल्या लैंगिक छळ प्रकरणातील कारवाईचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पालिका प्रशासनाकडून मागवला असून, त्यासंदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांना नोटीस बजावली आहे. नायरमधील लैंगिक छळप्रकरणी आपल्या स्तरावर केलेल्या कारवाईचा सद्यस्थिती अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ च्या कलम १२ (२) आणि (३) मधील तरतुदींनुसार तत्काळ सादर करावा, असे आयोगाने पालिका प्रशासनाला बजावलेल्या नोटीसीत नमूद केले आहे.
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक आणि निवारण कायद्याच्या (पॉश) अंमलबजावणीत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी अडथळे आणले. चौकशीच्या कामकाजात सहकार्य केले नाही. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास विलंब केला, अशी टिप्पणी मुंबई महापालिकेच्या चौकशी समितीने केल्याचा दावा करत डॉ. मेढेकर यांचे निलंबन करण्यात यावे, तसेच त्यांनी आरोपींशी हातमिळवणी केल्याच्या आरोपप्रकरणी आयोगाने स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी भिवंडीतील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली होती. शेख यांच्या मागणीनंतर आयोगाने पालिका प्रशासनाला नोटीस दिली आहे.