मुंबई: महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या 23 खासदारांचे रिपोर्ट लिफाफ्यात बंद करण्यात आले आहे. पक्षाच्या लोकसभा निवडणूक निरीक्षकांनी आपला रिपोर्ट दिल्लीला पाठवला आहे. दिल्लीत आज होत असलेल्या पक्षाच्या बैठकीत राज्यातील 23 खासदारांच्या कामगिरीवर चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीत कुणाला पुन्हा संधी द्यायची आणि कुणाचा पत्ता कट करायचा याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्यात सध्या भाजपचे 23 खासदार आहेत. या सर्व खासदारांच्या कामाचा रिपोर्ट तयार करण्यासाठी राज्यात वेगवेगळे निरीक्षक नेमण्यात आले होते. या निरीक्षकांनी आज दिवसभर अहवाल तयार केले असून ते आता बंद लिफाफ्यात दिल्लीला वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आले आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीची आज बैठक होत आहे. या बैठकीत हे अहवाल सादर केले जाणार आहेत. त्यानंतरच पुन्हा कोणत्या खासदाराला संधी मिळते, हे या अहवालातून स्पष्ट होणार आहे. भाजपने निरीक्षक नेमून प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील खासदाराचे रिपोर्टकार्ड तयार केले आहे. लोकसभेचे निरीक्षक संबंधित खासादारांच्या मतदारसंघात जाऊन माहिती गोळा करतील आणि तेथील लोकांच्या मनात काय आहे, ते जाणून घेतील, असं काम या निरीक्षकांना देण्यात आले होते. त्यानुसार या निरीक्षकांनी प्रत्येक मतदारसंघात जात जनभावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच खासदाराचे कामकाज आणि सर्वसामान्य नागरिकांचे त्याबद्दल असणारे मत , तसेच विद्यमान खासदाराऐवजी आणखी कुणाला या मतदारसंघातून संधी दिली जाऊ शकते, अशी दोन नावे या निरीक्षकांकडून रिपोर्टमध्ये देण्यात आली आहेत.