मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभेतील गटनेतेपदी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची, तर मुख्य प्रतोदपदी आमदार रोहित पाटील आणि प्रतोदपदी उत्तमराव जानकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. रविवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन येथे पार पडलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच विधिमंडळात आमच्या पक्षाचे संख्याबळ कमी असले, तरी आमचे सदस्य जनतेचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडतील, असा विश्वासही यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित रविवारी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत विधानसभेतील गटनेते आणि प्रतोदांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीस विधान परिषदेचे सदस्य उपस्थित नसल्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषद सभागृहातील पदाच्या निवडी तसेच विधिमंडळ पक्षनेते पदाची निवड केली जाईल. यावेळी ईव्हीएम बाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत पाच वाजल्यानंतर आठ टक्के इतके मतदान वाढले आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतरही इतक्या मोठ्या प्रमाणात मतांची टक्केवारी वाढत असेल, तर ती बाब चिंताजनक आहे, यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
तसेच निवडणूक आयोगाकडून मतदानानंतर नोंदवण्यात आलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष निकालादरम्यानच्या मतमोजणीतील आकडेवारी यात तफावत असल्याने ईव्हीएमबाबतीत अधिक संशय निर्माण होत आहे. तसेच या संपूर्ण निवडणूक काळात निवडणूक आयोगाने घेतलेल्या एकंदरीत भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. निवडणूक आयोगाने वाढलेल्या अतिरिक्त मतांची चौकशी केली पाहिजे. तसेच देशातील निवडणूक प्रक्रिया ही ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात यावी, या महाविकास आघाडीने केलेल्या मागणीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आपला पाठिंबा देत असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले. तसेच महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान लाडक्या बहिणींना २१०० देण्याचे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे, सोयाबीन व कापसाला योग्य भाव देण्याबाबत जी आश्वासने दिली आहेत, त्याची या सरकारने लवकर पूर्तता करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.