मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त आता रविवारवर गेला असून, उपराजधानी नागपुरात दुपारी ४ वाजता ३५ ते ४० मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या शपथविधीसाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनही रविवारीच नागपुरात दाखल होत आहेत. नव्या मंत्र्यांसाठी येथील ४० सरकारी बंगले सुसज्ज करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
भाजप आणि गृहखात्यासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेतील कोंडी फुटत नसल्यामुळे विस्तार सतत लांबणीवर पडत आहे. आता हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात रविवारी दुपारी ४ वाजता राज्यपाल नव्या मंत्र्यांना शपथ देतील. महायुतीत २१, १२, १० असा मंत्रीपदाचा फॉम्र्म्युला निश्चित झाला आहे. त्यानुसार, भाजपचे १७ ते १८, तर शिवसेना-राष्ट्रवादीच्या कोट्यातली सर्व मंत्री शपथ घेऊ शकतात. तर भाजप आपल्या कोट्यातली २ ते ३ मंत्रीपदे रिक्त ठेवेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने आपल्याकडे गृह आणि अर्थखाते ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेला नगरविकास आणि महसूल, तर राष्ट्रवादीला सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण खाते सोडण्यास भाजप तयार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन १० दिवस झाले आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम असल्याने मंत्रिमंडळ विस्तार अद्याप रखडला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबईत राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी होईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार, प्रशासनाला सूचनाही दिल्या होत्या, मात्र शिंदेंची नाराजी कायम असल्याने बहुचर्चित विस्तार होऊ शकला नाही. गुरुवारी सायंकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी बावनकुळे यांनी पुन्हा एकदा शिंदेंची भेट घेतली. बावनकुळे हे भाजप नेतृत्व व फडणवीस यांचा निरोप घेऊन शिंदे यांच्याशी चर्चा करत असले तरी कोंडी फुटलेली नाही.
महायुती सरकारमध्ये ज्या पक्षाकडे जी खाती होती, तीच खाती त्या त्या पक्षांना मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या मंत्र्यांची संख्या यावेळी अधिक असल्याने काही खात्यांची अदलाबदली होईल. भाजपकडे अर्थखाते जाईल, तर भाजपकडील महसूल शिवसेनेकडे जाऊ शकते. भाजपकडील सार्वजनिक बांधकाम व गृहनिर्माण ही खाती राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात. याशिवाय जलसंपदा किंवा ऊर्जासारखे खाते भाजपकडून मित्रपक्षाला दिले जाऊ शकते.
४३ जणांनाच मंत्रीपदाची संधी
राज्यात एकूण २८८ जागांपैकी नियमानुसार १५ टक्के म्हणजेच ४३ मंत्री होऊ शकतात. ३३ कॅबिनेट, तर १० राज्यमंत्री अशी राज्य सरकारची रचना आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपकडे मुख्यमंत्रीपदासह २१, शिवसेनेकडे उपमुख्यमंत्रीपदासह १२, तर राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रीपदासह १० मंत्रीपदे असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. भाजपला १६ कॅबिनेट, तर ५ राज्यमंत्रीपदे, शिवसेनेला ९ कॅबिनेट, तर ३ राज्यमंत्रीपदे, राष्ट्रवादीला ८ कॅबिनेट, तर २ राज्यमंत्रीपदे असे सूत्र ठरल्याची माहिती आहे.
कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार?
भाजप: गृह, अर्थ किवा महसूल, ऊर्जा, जलसंपदा, जलसंधारण, उच्च व तंत्रशिक्षण, ग्रामविकास, पर्यटन, आदिवासी विकास, वने, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, बहुजन कल्याण विकास, सामाजिक न्याय, रोहयो, फलोत्पादन, सामान्य प्रशासन, विधी व न्याय.
शिवसेना: नगरविकास, जलसंपदा किंवा एमएसआरडीसी, उद्योग, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, पाणीपुरवठा व स्वच्छता, शालेय शिक्षण पणन.
राष्ट्रवादी: अर्थ किंवा सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, सहकार, कृषी, महिला व बालकल्याण, आदिवासी किवा अन्न व औषधी प्रशासन, मदत पुनर्वसन, क्रीडा व युवक कल्याण
संभाव्य मंत्री कोण?
भाजप: चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील. गिरीश महाजन, पंकजा मुंडे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, बबनराव लोणीकर, विजयकुमार गावित, आशिष शेलार किया योगेश सागर, संभाजी निलंगेकर, संजय कुटे, जयकुमार रावळ, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राहुल आहेर, गोपीचंद पडळकर, नितेश राणे, राहुल कुल.
शिवसेना: दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, भरत गोगावले, संजय शिरसाट, आशिष जैस्वाल, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, योगेश कदम, प्रकाश आबिटकर.
राष्ट्रवादी: छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा अत्राम, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, मकरंद पाटील, अनिल पाटील, दत्तात्रय भरणे, संजय बनसोडे किंवा राजू नवघरे, माणिकराव कोकाटे किवा संग्राम जगताप.