मुंबई: २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत देशभरात उत्सुकतेचं वातावरण आहे. प्रत्यक्ष अयोध्येमध्ये राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारकडून जय्यत तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारनेही मोठा निर्णय घेत अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन निमित्त सोमवारी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २२ जानेवारी दिवशी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. या दिवशी दिवसभर अयोध्येत रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.
दरम्यान केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुटी देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत असलेली भावना आणि त्यांच्याकडून करण्यात येत असलेली विनंती विचारात घेऊन सरकारने या दिवशी अर्धा दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. या दिवशी शाळा महाविद्यालयेही अर्धा दिवसच सुरू राहतील
श्री राम मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलला विराजमान होणार आहेत. सर्वच भारतीयांसाठी हा महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी पूर्ण देशभर दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे आणि त्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजप नेते व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.