मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रमुख नेते १० ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात जिल्हानिहाय बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी सांगितले.
दौऱ्यात चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, नसीम खान, अमित देशमुख सहभागी होणार असून, जिल्हानिहाय बैठका घेऊन ते स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून निवडणूक तयारीचा आढावा घेतील.
मराठवाडा दौऱ्यात १० ऑगस्ट रोजी लातूर, धाराशीव आणि बीड जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांसोबत लातूर येथे बैठक होईल. ११ ऑगस्ट रोजी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांची बैठक नांदेड येथे, तर १२ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत छत्रपती संभाजीनगर येथे आढावा बैठक होईल.