Maharashtra Budget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सरकारविरोधात जोरदार घोणबाजी करण्यात आली. ‘गेली ती शिवशाही, आली ती गुंडशाही’, महाराष्ट्राचा कल्लू मामा कोण?, ‘शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी’, ‘गुंडांना पोसणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो’ असे फलक हातात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. विरोधक विधानभवन परिसरात नकली पिस्तूल घेऊन आले होते. पिस्तुले रोखून त्यांनी राज्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनांकडे लक्ष वेधत बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर ताशेरे ओढले.
अधिवेशनातील ठळक बाबी
– मराठा आरक्षण टिकणार कसे, असे कारण न देता सर्वांच्या एकमताने आरक्षण देण्यात आले. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण दिले. मात्र, आता मनोज जरांगे यांनी फडणवीसांबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांच्यामागे कोण आहे, हे शोधले पाहिजे. संपवून टाकू, निपटून टाकू याचे बळ कोणी दिले? त्यांची भाषा राजकीय आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– शरद पवार यांच्या सांगण्यानुसार मनोज जरांगे वागत आहेत. राजेश टोपे यांच्या कारखान्यांवर दगडफेकीचे कटकारस्थान रचले गेले. त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमदार प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली. जरांगेंच्या सभेवर खर्च कोणी केला, जरांगेंना शरद पवारांचे फोन येत होते. मुख्यमंत्री, भुजबळ यांना धमकी देण्याची हिंमत कोणी दिली? अंतरवली सराटीत दगडफेक कुणी केली? त्यामागे कुणाचा हात आहे हे समोर आलं पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार, प्रविण दरेकर यांनी केली आहे.
– जरांगे राजकारणी नव्हते, त्यांना राजकारणी कोणी केले, त्यांच्यामागे कोणती शक्ती आहे? असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. विधानसभेचे कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले आहे.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही, अशी भाषाही जरांगे यांनी वापरली. या सगळ्यात कटकारस्थान आहे. त्यांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी केली. त्यांच्या आंदोलनामागे कोणता पक्ष, कोण व्यक्ती आहे, याची चौकशी झाली पाहिजे. मनोज जरांगे यांची भाषा महाराष्ट्राला बेचिराख करण्यारी आहे. धमकी देण्याची हिंमत जरागें यांच्यामध्ये कुठून आली, असा सवाल भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
– भाजपकडून अजित पवार यांचा वापर केला जात आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढत केल्याने भाजपला त्यांचा फायदा होईल, सामान्य लोक शरद पवार यांच्यासोबत आहे. पवार-विरुद्ध पवार लढाई होऊ नये, असे कुटुंब म्हणून मला वाटते : रोहित पवार
राज्य सरकारकडून अवघ्या काही तासांत अंतरिम बजेट सादर होणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काही लोकप्रिय घोषणा केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थमंत्री अजित पवार आपल्या पेटाऱ्यातून काय काय बाहेर काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुपारी दोन वाजता अजित पवार विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.