मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीमध्ये जागा वाटप आणि उमेदवारीच्या मुद्दयावर प्रचंड चर्चा सुरु आहेत. माहिमचे आमदार सदा सरवणकर यांनी मनसे नेते आणि उमेदवार अमित ठाकरे यांच्यासाठी उमेदवारी मागे घ्यावी अशी चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे सदा सरवणकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांचे व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत आले आहे.
समाधान सरवणकरांच्या स्टेटसनंतर माहीममध्ये आता तिहेरी लढत अटळ असल्याचे बोललं जात आहे. आज शिवसेना आमदार सदा सरवणकर शिवसेना शिंदेगटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवलं असून उद्या म्हणजे, मंगळवारी 29 ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज भरणार असल्याची माहिती दिली आहे. समाधान सरवणकरांनी स्टेटसमध्ये लिहिलं आहे की, “आमदार सदा सरवणकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता सर्वांनी शाखा क्रमांक 194, सामना प्रेस प्रभादेवी इथे उपस्तिथ राहावं…”
दरम्यान शिवसेनेचा बालेकिल्ला अशी माहीम विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. हा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर महायुतीकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून महेश सावंत हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे समाधान सरवणकरांच्या स्टेटसनंतर माहीममध्ये आता तिहेरी लढत अटळ असल्याचं बोललं जात आहे.