मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि आमदार महादेव जानकर यांना महाविकास आघाडीने माढा लोकसभेची जागा दिल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी जाणकारांची मनधरणी करत त्यांना एक जागा देऊन महायुतीमध्ये परत आणले होते. आता महादेव जानकर हे महायुतीमधून परभणी लोकसभा मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी महादेव जानकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणीची जागा सोडण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. त्यामुळे आता परभणी लोकसभेसाठी महादेव जानकर हे मैदानात उतणार आहेत. त्यांचा सामना शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांच्याशी होणार आहे. राष्ट्रवादीने महायुतीकडे सहा ते सात जागा मागितल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. सुनील तटकरे हे स्वतः रायगडमधून रिंगणात असणार आहेत. बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची उमेदवार निश्चित आहे, तर शिरूरमधून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, बारामतीच्या जागेची आज घोषणा केली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र याबाबत अजून कोणतीही घोषणा करण्यात आली आहे.