मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे महायुतीतून बाहेर पडले आहेत. एवढंच नाही तर, महादेव जानकर यांचा पक्ष आता स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीतील जागावाटपावरून जानकर नाराज असल्याची चर्चा होती.
महादेव जानकर हे गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरु होती. महायुतीकडे विधानसभेसाठी त्यांनी 40 ते 50 जागांची मागणी केली होती. मात्र, त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेच त्यांनी आता महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आता राज्यात सर्व जागा स्वबळावर लढणार आहेत.
महायुतीतून बाहेर पडल्यानंतर महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आपल्याशी महायुती किंवा महाविकास आघाडीने संपर्क साधला नसून आपण आपल्या पक्षाच्या वाढीसाठी हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात 288 जागा लढवण्यासाठी आपण तयारी करत असल्याचंदेखील महादेव जानकर यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभेला महायुतीने आम्हाला एक जागा दिली होती. मात्र, आमचा पक्ष मोठा झाला पाहिजे, आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, यासाठी आम्ही तयारी करत आहोत. राज्यातील 200 मतदारसंघामध्ये प्रत्येक जागेसाठी तीन-तीन अर्ज आले आहेत. आता फक्त 88 जागा राहिल्या आहेत. काही ठिकाणी आम्ही विजयी होऊ, काही ठिकाणी दोन नंबरची मतं घेऊ. काही ठिकाणी 10 हजारांपेक्षा जास्त मतं घेऊ, असं महादेव जानकर यावेळी म्हणाले.