मुंबई : मुंबईकरांना नववर्ष उत्साहात साजरे करता यावे, यासाठी सरकारने मद्यप्रेमींसाठी मुंबईतील वाईन शॉप मध्यरात्री १ वाजेपर्यंत, तर हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सरकारने ही सूट केवळ ३१ डिसेंबरसाठीच खास दिली आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे. ही शिथिलता ३१ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत असणार आहे. याचा अर्थ मुंबईतील सर्व प्रकारच्या दारूंची दुकाने १ वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. वाईनशॉपसोबतच बीयरबार, परमिट रूम यांनादेखील वेळेत शिथिलता देण्यात आली आहे.
त्यानुसार ३१ डिसेंबरच्या रात्री बार हे पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. तसेच परवानाधारक क्लब आणि कक्षांनाही पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या बाहेर रात्री साडेअकरा ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत तर, पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात रात्री दीड ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत शिथिलता असेल.
सीएल-३ अनुज्ञाप्ती यांना महानगरपालिका तसेच ‘अ’, व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञाप्तींसाठी रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री १० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत शिथिलता असणार आहे. ही वेळेची शिथिलता ३१ डिसेंबर रोजी असेल, असे मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी कळवले आहे.