मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत असतांना याच दरम्यान, मंगळवारी रात्री घडलेल्या एका प्रसंगामुळे राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी भेट घेतली. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्यापाठोपाठ शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील हेदेखील मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पोहोचले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील महत्त्वाच्या नेत्यांनी एकाच रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय गोटात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र येणार का, या चर्चांना उधान आले आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनावेळी, शरद पवार गटाच्या १० पैकी ९ आमदारांची भाजपसोबत युती करण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यातच आता मंगळवारी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
या भेटीबाबत बोलताना जयंत पाटील यांनी स्पष्ट केले की, ही भेट आधीच ठरलेली होती आणि त्याचा उद्देश केवळ ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या विषयावर चर्चा करणे हा होता. दरम्यान, आता शरद पवार गट भाजपमध्ये सामील होणार की काय, अशा चर्चांना उधान आले आहे.








