मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून चर्चा रंगू लागला आहे. अशातच आता शरद पवार यांनी एक दावा केला आहे. ते म्हणाले की, भाजपचा जन्म होण्यापूर्वी जनसंघ महत्त्वाचा पक्ष होता. त्या जनसंघाची वाढ ही भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून झाली होती. अनेक राजकीय लोक तिथून निवडून येत होते. सामान्य लोकांचे प्रश्न त्यावेळी पक्षाचा वतीने मांडणारी ही विचारधारा होती. आजचा भाजप आणि आधीचा भाजप यात मोठा फरक होता. परिणामी, राज्यात मागच्या 2 महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातील 80 टक्के लोक हे एकट्या भाजपमधून आहेत. असा मोठा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
हल्ली भाजपला जोडून जात असलेले लोक अस का करत आहेत? तर त्याच कारण असं होतं की, पक्षात पूर्वीसारखी शिस्त राहिली नाही. असं भाजपचे एक नेते जे माझे मित्र आहेत ते सांगत होते. भाजपमधील आताचे नेतृत्व बघितलं तर आधी जी शिस्त होती, ती आताच्या नेतृत्वाकडून पाहायला मिळत नाही. त्यामुळे असं घडत असल्याचेही शरद पवार यावेळी म्हणाले.
सत्ताधाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि पायउतार व्हावं…
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान, या घटनेवर शरद पवार यांनी खेद व्यक्त केला असून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या म्हणजे सर्वसामान्यांसाठी धोक्याची घंटा असून याची चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारावी आणि सत्ताधाऱ्यांनी पायउतार व्हावं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
केवळ चौकशीच नको तर…
राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.