मुंबई : कुर्ला न्यायालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदाराकडे लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला सत्र न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. फिर्यादी पोलीस हवालदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १६ मे रोजी सापळा रचून १८०० रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस अधिकारी सुयश शरद कांबळे याला रंगेहाथ अटक केली होती.
आरोपीने फिर्यादीला कर्तव्यावर गैरहजर राहण्याच्या बदल्यात महिना ८ ते १८ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले आणि लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी अटक झाल्यानंतर त्याने अॅड. अर्जुन कदम यांच्यामार्फत विशेष सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश निखील मेहता यांच्यासमोर सुनावणी झाली. उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीला तुरुंगात ठेवण्याची गरज नाही, असे स्पष्ट करून ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्याचा त्याला जामीन मंजूर केला.