मुंबई : कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव बेस्ट बसने बाजारपेठेत घुसून अनेकांना उडवल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी रात्री पाऊणे दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात 35 जण गंभीर जखमी झाले आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बेस्ट बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच, पोलिसांनी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
कुर्ला येथील आंबेडकर नगर परिसरात 332 क्रमांकाची बस सोमवारी रात्री कुर्ला वरुन अंधेरीकडे निघाली होती. याचवेळी हा अपघात झाला. या अपघातात जवळपास दहा ते पंधरा गाड्यांना बेस्ट बसने धडक दिली आहे. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघाग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलीसांनी सांगितले.
कुर्ला येथील बेस्ट बस अपघातात आतापर्यंत मृतांचा आकडा 5 झाला आहे. तर जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय विष्णू गायकवाड(70), आफ्रीन अब्दुल सलीम शहा(19), अनम शेख(20), कणीस फातिमा गुलाम कादरी(55), शिवम कश्यप(18) अशी मृतांची नावं आहेत. ज्यावेळी हा अपघात घडला, त्यावेळी अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, या अपघातात काही गाड्यांचा देखील चक्काचूर झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच बेस्ट बसचा चालक हा मद्यधुंत अवस्थेत असल्याचा आरोप देखील आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता या घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केला असून पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे. मात्र, या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.