मुंबई : शहरातील कुर्ला भागात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या बसने 30 हून अधिक लोकांना चिरडले. कुर्ला पश्चिमेकडील आंबेडकर नगर भागात ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत एकूण 7 जणांचा मृत्यू असून 49 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बसचालक संजय मोरे यास अटक केली आहे.
आज बसचालक संजय मोरेला कुर्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी आता संजय मोरे यांच्या कुटुंबियांनी बोलताना सांगितले की, माझे पती नेहमीप्रमाणे कामावर जातात, तसेच ते सोमवारी रात्रीही निघाले. आम्ही दोघंही नेहमीप्रमाणे आमच्या स्टॉलवर गेलो. ते तिकडून कामावर जायला निघाले. ते नेहमी वेळेवर कामावर जातात. माझा नवरा दारु कधीच घेणार नाही. तसेच आजपर्यंत कधीही ते मान वर करुन कुणालाही बोलले नाही. आज आमच्या लग्नाला 23 वर्षे झाली आहे. पण अजूनपर्यंत कधीही कोणताही अपघात झाला नव्हता. माझा नवरा निर्दोष आहे, त्यांची नक्की सुटका होईल. कारण त्यांनी कधीच कोणाचं वाईट केलेलं नाही. काल सोमवारी रात्री जी घटना झाली, ते चुकून झाली आहे. त्यात काय करणार… तुमच्या गाड्या व्यवस्थित नाही. माझ्या नवऱ्याची काहीही चूक नाही.
यावेळी बोलताना बसचालकाच्या मुलाने सांगितले की, अपघातापूर्वी संजय मोरे मद्यपान करुन गाडी चालवत होते, अशा आलेल्या बातम्या खोट्या आहेत. माझे बाबा कधीच मद्यपान करत नाही. त्यांच्याकडे 1989 सालापासून गाडी चालवण्याचा परवाना आहे. तसेच काहीजण बोलत आहेत की, माझे बाबा हे 1 डिसेंबरपासून बस चालवायला घेतली, हे पूर्णपणे खोटं आहे. कोरोना लॉकडाऊननंतर माझे बाबा बेस्टमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहेत. गेल्या 35 वर्षांपासून ते गाडी चालवत आहेत. इतके दिवस काही अपघात झाला नाही आणि आजचं कसा काय झाला?, माझे बाबा अत्यंत सावधगतीने गाडी चालवात. त्यामुळे काल सोमवारी जो अपघात झाला तो बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळेच झाला आहे, असा दावा बसचालकाच्या मुलाने केला आहे.