मुंबई : भाजपच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता निश्चित झाल्याचे मानले जात असतानाच महायुतीतील सर्वच पक्षांनी मंत्रीपदांसाठी जोरदार फिल्डिंग सुरू केली आहे. युतीतील तीनही घटक पक्षांना अधिकाधिक आणि महत्त्वाची मंत्रीपदे पदरात पाडून घ्यायची आहेत. त्यामुळे आपापल्या अपेक्षापूर्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, या निकालात सगळेच विक्रम मोडीत काढणाऱ्या भाजपच्या अनेक ज्येष्ठ आमदारांनाही मंत्री होण्याची तीव्र इच्छा आहे. त्यासाठी त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीत ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री पदांची मागणी केल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी ७ जणांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाककडून धनंजय मुंडे, अदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा अत्राम, अजित पवार, छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे.
भाजपमध्ये फडणवीस यांच्याकडेच प्रयत्न
भाजपकडून मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा असलेले सगळेच आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करत आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले होते, त्यामुळे मंत्रीपदासाठी त्यांच्याकडेच लॉबिंग सुरू असल्याचे दिसून येते. गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, राहुल कुल, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक, पंकजा मुंडे यांच्या नावांची चर्चा आहे.
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य यादी
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे. त्यात उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, राजेश क्षीरसागर, आशिष जैस्वाल यांची नावे मंत्रीपद मिळण्यासाठी आघाडीवर आहेत.