मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये (Maharashtra Budget 2024) 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट 9 हजार 734 कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी लेक लाडकी योजनेबाबत (Lekh Ladki yojana) मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये या योजनेची सुरुवात केली होती.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक 2023 लाडकी योजना (Lekh Ladki yojana) सुरू करण्यात आली आहे. दरम्यान मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत यामध्ये टप्प्याटप्प्यानं 1 लाख 1हजार रुपये मिळतील, अशी तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. या योजनेंतर्गत मुलगी सज्ञान होईपर्यंत तिला आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
नेमकी ही योजना काय?
लेक लाडकी योजनेंतर्गत (Lekh Ladki yojana) पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, 11वीत गेल्यावर आठ हजार रुपये आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये अशा पद्धतीने त्या मुलीला एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे.
कोणाला मिळणार फायदा?
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबात 1 एप्रिल 2023 नंतर जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.