मुंबई : कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, पण मी जे बोललो त्याला सबळ आधार आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी श्लोक, अन्नपुराणी नावाचा सिनेमा, इतिहासातली ही स्तोत्रं यांचा दाखला दिला आहे. श्री राम मांसाहारी होते, या जितेंद्र आव्हाडयांच्या वक्तव्यावरून राज्यात वातावरण तापलं असताना जितेंद्र आव्हाड त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हणाले आहेत.
मी जे काही बोलतो ते अभ्यासाशिवाय बोलत नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. आमचा राम जात-पात न मानणारा आहे, शबरीची बोरं खाणारा आहे, जे राम-राम करत आहेत त्यांना मी सांगेन की तुमचा राम तुम्हाला निवडणुकीसाठी बाजारात आणायचा आहे. आमचा राम आमच्या जन्मापासून आमच्या हृदयात आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच वाल्मिकी रामायणाचा दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी आपण काहीही चुकीचं बोललो नाही असंही म्हटलं आहे.
श्लोकात उल्लेख
विकृतीकरण माझं काम नाही. राम, प्रभू श्रीराम, विठ्ठल सगळी एकच रुपं आहेत. मी श्रीरामांबद्दल बोललो की ते मांसाहरी होते. जे याविरोधात बोलत आहेत त्यांच्या माहितीसाठी वाल्मिकी रामायणात एक संदर्भ आहे. त्यातल्या अयोध्या कांडात एक श्लोक आहे. तो मी वाचत नाही कारण मला वाद वाढवायचा नाही.
अन्नपुराणी सिनेमाचा दाखला
अन्नपुराणी सिनेमात वाल्मिकी रामायणातला श्लोक दाखवला आहे. त्याचा संदर्भही बोलून दाखवला आहे. आजकाल अभ्यासाला नाही तर भावनांना महत्त्व आहे. माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याविषयी खेद व्यक्त करतो असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. गुन्हे दाखल करायला काही हरकत नाही मी त्यांना घाबरत नाही.