मुंबई : बेरोजगारी आणि महागाई या विषयांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चार तरुणांनी लोकसभेत १३ डिसेंबर रोजी घुसखोरी केली होती. त्यांची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात धक्कादायक सत्य समोर आले आहे. आरोपींनी त्यांच्या पोलिसांकडून छळ झाल्याचे म्हटले आहे. त्याबाबत जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं आहे.
लोकसभा आणि संसदेत घुसखोरी करून चार तरुणांनी १३ डिसेंबर २०२३ रोजी हल्ला केला. त्यानंतर तपास यंत्रणांनी चार घुसखोर तरूण आणि त्यांना मदत करणाऱ्या इतर दोघांना अटक केली होती. काल (३१ जानेवारी) न्यायालयात या तरुणांना हजर केले असता त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून हे दावे केले आहेत. ते म्हणाले, “हे अत्यंत भयावह आहे. संसदेवर हल्ला करणाऱ्या तरुणांची सुनावणी आज कोर्टासमोर समोर होती. यावेळी “विरोधी पक्षांच्या नेत्यांचे नाव घ्या”, असा दबाव टाकत पोलिसांनी आम्हाला प्रचंड यातना दिल्या. आम्हाला इलेक्ट्रिक शॉक दिले आणि आमच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी कोऱ्या कागदावर सह्या करण्यासाठी दबाव बनवला”, असे आरोप या तरुणांनी केले आहेत.”
हे अत्यंत भयावह आहे.
संसदेवर हल्ला करणाऱ्या तरुणांची सुनावणी आज कोर्टासमोर समोर होती.यावेळी
"विरोधी पक्षांच्या नेत्यांचे नाव घ्या",
असा दबाव टाकत पोलिसांनी आम्हाला प्रचंड यातना दिल्या.आम्हाला इलेक्ट्रिक शॉक दिले.आणि आमच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी कोऱ्या कागदावर सह्या करण्यासाठी दबाव…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 31, 2024
“एखाद्या सिनेमाच्या पटकथेला लाजवेल अशा पद्धतीने हे सरकार आपल काम करत आहेत. खरतर सदर तरुणांना ज्या भाजपा खासदारांनी पास दिला, त्यांची साधी चौकशी तर सोडाच उलट त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.त्याचवेळी पकडलेल्या तरुणांनी, विरोधी पक्षातील नेत्यांची नावे घ्यावीत, यासाठी त्यांच्यावर दबाव बनवला जात आहे. या पोरांनी धिटाई दाखवत आज कोर्टासमोर आपली परिस्थिती मांडली. जर या पोरांनी ही धिटाई दाखवली नसती तर काय…? हा नुसता विचार करून भीती वाटते. राजकीय फायद्यासाठी कुठ घेऊन जाताहेत तुम्ही या देशाला?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.