मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, या दोन नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या आधी देखील गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळीही या दोन नेत्यांमध्ये जवळपास १५ मिनिटे चर्चा झाली होती. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या दोघांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
याबाबत शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी खुलासा केला आहे. जितेंद्र आव्हाड ठाण्याचे आहेत. त्यामुळे मित्र म्हणून त्यांना भेट घ्यायची असेल, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड आमच्यासोबत आले तर स्वागतच आहे, असंही उदय सामंत यांनी नमूद केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे सरकार पुन्हा आले आहे. मात्र, अद्याप मुख्यमंत्रीपदाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्याचा कारभार सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच पाहत आहेत. अशा परिस्थितीत जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.
दरम्यान, काल अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महारष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.