मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावर आपला निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी (ता.7) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना दिले आहे. हा निकाल म्हणजे खासदार शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हांडांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “फार आश्चर्यकारक निर्णय लागला आहे, असं अजिबात वाटत नाही. ज्या दिवशी राष्ट्रवादी पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढली गेली, त्याच दिवशी आमच्या मनात शंका आली होती. त्यानुसार हे सर्व घडलं आहे. आम्ही आमची बाजू आयोगाकडे स्पष्टपणे होती. आम्हाला माहिती होतं, चिन्ह आणि पक्ष काढून घेतलं जाणार आहे. यातून शरद पवारांना अजित पवार गट मरण यातनाच देत आहे. ज्या माणसाने लहानाचं मोठं केलं, त्या माणसाकडून तुम्ही सगळं काढून घेतलं. आम्हाला कोणत्याही चिन्हाची गरज नाही, आमचं चिन्ह शरद पवारच, ” जितेंद्र आव्हाडांनी अशी प्रतिक्रिया दिली.