नवी मुंबई : खारघरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. खारघर सेक्टरमधील एका ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकून तीन दरोडेखोरांनी लाखोच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. ही घटना रविवारी (दि.28) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. यावेळी दागिन्यांची चोरी केल्यानंतर हवेत गोळीबार करुन चोरटे पसार झाले आहेत. ही सगळी घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , एम बी ज्वेलर्स असे दरोडा टाकण्यात आलेल्या सराफा दुकानाचे नाव आहे. खारघर येथील सेक्टर 30 मध्ये एम बी एम ज्वलर्स नावाचे हे दुकान आहे. चोरट्यांचा इतरांना चेहरा दिसू नये तसेच सीसीटीव्हीत चेहरा कैद होऊ नये म्हणून त्यांनी डोक्यावर हेल्मेट लावले होते. त्यांच्या हातात पिस्तुल होते. हेल्मेटसह ते सराफ दुकानात घुसले.
दरोडेखोरांनी दुकानातील सोने-चांदीचे अनेक दागिने लंपास केले आहेत. एकूण तिघांनी हा दरोडा टाकला असून त्यांच्याजवळ पिस्तुल होते. या दरोड्यात त्यांनी लाखो रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास केले आहेत.
यावेळी दुकानाच्या बाहेर असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केला, मात्र दरोडेखोरांच्या हातात पिस्तुल असल्याने कोणीही दरोडेखोरांच्या समोर आले नाही. त्यानंतर दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत लुटलेल्या मुद्देमालासह दुचाकीवरुन धूम ठोकली. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सिनेस्टाईलने टाकलेल्या या दरोड्यामुळे सध्या या भागात तणावाची स्थिती आहे. या प्रकरणी खारघर पोलीस शोध घेत आहेत.