मुंबई : भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. बुधवारी ३ एप्रिल रोजी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला आहे. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा उमेदवारी न दिल्याने उन्मेष पाटील नाराज होते. आता ते शिवसेना -ठाकरे गटात दाखल झाल्याने त्यांना जळगावमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंगळवारी खासदार उन्मेष पाटील यांनी मुंबईमध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्यांची एक बैठक झाली. त्याचवेळी उन्मेष पाटील हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात दाखल होण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर त्यांचा आज शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अधिकृत पक्षप्रवेश झाला आहे. जळगावमध्ये भारतीय जनता पक्षाने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याने ते ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत.
शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर खासदार उन्मेष पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पक्षाला माझ्या कामाची किंमत नाही. जरी एका भावाने मला दगा दिला असला तरी, दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत आहे, हा मला विश्वास असल्यानेच आपण शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सामील होत असल्याचे उन्मेष पाटील यांनी म्हटले आहे.
आधी राजीनामा, मगच केला प्रवेश
दरम्यान, शिवसेना-ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी खासदार उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उन्मेष पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. ई-मेलच्या माध्यमातून उन्मेष पाटील यांनी त्यांचा लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा हा पाठवला आहे.