मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. युती-आघाडीची जागा वाटपावर बोलणी सुरु आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका अधिकाऱ्याच नाव सद्या चर्चेत आहे, ते म्हणजे समीर वानखेडे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवू शकतात. असं बोललं जात आहे. तीन वर्षांपूर्वी समीर वानखेडे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलं होतं. समीर वानखेडे यांनी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीच सरकार होतं. समीर वानखेडे यांच्यावर त्यावेळी अनेक आरोप सुद्धा झाल्याचे बघायला मिळालं होते.
समीर वानखेडे यांचा नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. समीर वानखेडे मुंबईच्या धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ते निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे म्हटलं जात आहे. या संदर्भात त्यांची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत बोलणी फायनल झाल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हाय प्रोफाइल आयआरएस अधिकारी समीर वानखेडे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करु शकतात.
धारावी काँग्रेसचा बालेकिल्ला..
विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी समीर वानखेडे यांना आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. काही महिन्यांपूर्वी ते राजकारणात उतरणार अशी चर्चा रंगली होती. राजीनामा दिल्यानंतर ते शिवसेना शिंदे गटात सहभागी होतील, धारावी हा मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा परंपरागत मतदारसंघ आहे. त्या धारावीमधून आमदार होत्या. पण 2024 ला खासदारकीची निवडणूक जिंकून त्या लोकसभेवर गेल्या आहेत. 2019 साली शिवसेनेने धारावीमधून आशिष वसंत मोरे यांना उमेदवारी दिली होती. पण वर्षा गायकवाड यांनी शिवसेना उमेदवाराचा दारुण पराभव केला होता.