मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवलीतून एक दुखःद बातमी समोर आली आहे. एका निर्माणाधीन इमारतीमध्ये बांधकाम सुरु असताना मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबबत अधिक माहिती अशी की, बोरिवली पश्चिमेला असणाऱ्या कल्पना चावला चौकातील सोनी वाडी येथील इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. याठिकाणी एका 24 मजली इमारतीचे बांधकाम सुरु होते. 16 व्या मजल्यावर कामकाजासाठी एक लोखंडी मचाण उभारण्यात आली होती. या लोखंडी मचाणीवर उभे राहून कामगार काम करत होते. मात्र, दुपारी सव्वा एकाच्या सुमारास ही लोखंडी मचाण अचानक कोसळली.
त्यामुळे मचाणीवर उभे असलेले कामगार लोखंडी पाईप्सच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या लोखंडी पाईप्सच्या वजनाखाली दबलेल्या कामगारांना तातडीने बाहेर काढून नजीकच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. तर एकाची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.